Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग पहिला (व्हिडिओसह)


नवीन नाटक, नवीन कथानक, नवीन गाणी, नवीन संगीत अशा नावीन्याने भारलेल्या काळात रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी संगीत नाटकांच्या लेखनाकडे वळले आणि रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ संस्थेनं त्यांची अनेक नाटकं संगीत रंगभूमीवर आणली. त्यातील काही नाटकांतील नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. काही नाट्यानुभव, काही नाट्यपदांच्या जन्मकथा आणि संगीतातील काही प्रयोग अशा काही गोष्टींसह, आगळ्यावेगळ्या नाट्यपदांची ही मैफल ते रंगवणार आहेत. त्या मैफलीचा हा पहिला भाग... 

.....
श्री नटेश्वर, आद्य संगीत नाटककार, संगीत दिग्दर्शक, गायक कलाकार आणि रसिक यांना वंदन करून सादर करीत आहोत...  नाट्यसंजीवनी...! अर्थात नवीन संगीत नाटकांतील नाट्यपदांची मैफल...

नाट्यसंगीत आणि जाणकार रसिक यांचं नातं खूप जुनं.  नेमकं सांगायचं तर गेली पावणेदोनशे वर्षे मराठी नाट्यसंगीताचा नादमधुर प्रवाह अव्याहत वाहतो आहे. अनेक वाटा, वळणे, लहानमोठे प्रवाह यामुळे नाट्यसंगीताचा हा प्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होऊन रसिकांच्या हृदयात कायमचा घर करून राहिला आहे. 

मध्यंतरी काही काळ हा प्रवाह थोडा शबलीत झाला होता; पण प्रतिभावान संगीत नाटककार, विलक्षण ताकदीनं गाणारे अभिजात गायक, रसपरिपूर्ण आणि सशक्त कथानकं, प्रयोगशील संगीत दिग्दर्शक यांच्यामुळे संगीत रंगभूमीला पुन्हा एकदा सुवर्णयुग प्राप्त झालं. 

याच काळाच्या उत्तरार्धात संगीत नाट्यस्पर्धांच्या निमित्ताने नवीन कालखंड सुरू झाला आणि मग त्याच त्या पारंपरिक नाटकांपेक्षा नवीन काही तरी करण्याच्या ऊर्जेनं, ताज्या दमाच्या कलाकारांना झपाटून टाकलं. त्यातून सुरू झाली संगीत नाटकांची नवनिर्मिती. 

नवीन नाटक, नवीन कथानक, नवीन गाणी, नवीन संगीत अशा नावीन्याने भारलेल्या काळात मी संगीत नाटकांच्या लेखनाकडे वळलो आणि रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ संस्थेनं माझी अनेक नाटकं संगीत रंगभूमीवर आणली. त्यातील काही नाटकांतील नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे आपणासारख्या चोखंदळ रसिकांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा आहे. 

सध्याच्या काळात नाट्यसंगीताला नवीन संजीवनी देण्याचे जे कार्य आम्ही केले आहे, ते आपल्याला नक्की आवडेल अशी खात्री आहे. संगीत शांतिब्रह्म, संगीत घन अमृताचा या नाटकांतील काही नाट्यपदे, प्रति दिवशी एक या पद्धतीने सादर करणार आहोत. हा उपक्रम आपल्याला आवडल्यास माझ्या अन्य काही नाटकांतील सुश्राव्य पदेही मी आपणासमोर आणणार आहे. 

आजपासून सादर होणाऱ्या या नाट्यपदांची रचना माझी (डॉ. श्रीकृष्ण जोशी) असून, त्या पदांना संगीत दिले आहे, श्री. विजय रानडे यांनी. रत्नागिरीतील सौ. प्राजक्ता लेले, स्वरांगी रानडे आणि विजय रानडे यांनी गायिलेल्या या पदांना ऑर्गनसाथ केली आहे वरद सोहनी याने. आणि तबल्याची साथसंगत आहे केदार लिंगायत याची. 

काही नाट्यानुभव, काही नाट्यपदांच्या जन्मकथा आणि संगीतातील काही प्रयोग अशा काही गोष्टींसह, आगळ्यावेगळ्या नाट्यपदांची ही मैफल रंगवणार आहे. 

।। नांदी ।।

संपूर्ण नाट्यगृह खूप औत्सुक्यानं समोरच्या मखमली पडद्याकडे पाहत आहे.

पडद्यासमोर ऑर्गनवादक, तबलजी आपापली वाद्ये घेऊन सज्ज आहेत. 

मखमली पडद्याआड रंगमंचावर नटराजाची यथाविधी पूजा झाली आहे. 

वातावरण प्रसन्न झालं आहे. 

इतक्यात तिसरी घंटा घणघणते आणि निवेदनाला सुरुवात होते... 

निवेदन संपतं आणि ऑर्गनवादक नांदी साठी सूर देतो. 

आणि सुरू होतं सुरांचं मोहमयी मायाजाल... 

गेली अनेक वर्षे रसिकांच्या काळजाला छेडणाऱ्या मराठी नाट्य संगीताचं पर्व नाटकाच्या नांदीनं सुरू होतं. आणि उत्तरोत्तर बहरत जातं नाटकातील नाट्यसंगीत... 

संगीत स्वरयात्री हे माझे पहिले संगीत नाटक. त्या नाटकातील नांदी हे माझे पहिले नाट्यपद. त्या नाटकाला ज्यांनी संगीत दिले त्या विजय ठोमरे यांचे ते पहिलेच संगीत दिग्दर्शन. खल्वायन या संस्थेचे पहिलेच नवे संगीत नाटक. असा सगळा नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. 

एखाद्या गाण्याचे भाग्य कधीकधी खूप वेगळे असते. या वाक्याचा प्रत्यय वर्षभरापूर्वी मला आला. वीस वर्षांनंतर, रत्नागिरीतील उमद्या कलाकारांनी साकारलेली ‘स्वरयात्री’ नाटकातील अप्रतिम नांदी, पुन्हा एकदा ऐकता आली. तो आनंद स्वर्गीय होता. कारण गायक-वादक संमेलनात मी लिहिलेल्या नांदीचे भरजरी कोडकौतुक ऐकायला मिळाले होते. 

आनंद पाटणकर, श्वेता जोगळेकर, सिद्धी बोंद्रे, अभिजित भट, प्रतीक जोशी, साईश प्रभुदेसाई, अभय मुळ्ये, संध्या सुर्वे अशा गायक-गायिकांच्या मुखातून ती नांदी साकारली होती. 

विलासजी हर्षे, सुमेध सावरकर, राजेंद्र भडसावळे, संतोष आठवले, वरद सोहनी, सौरभ हर्षे असे सहा ऑर्गनवादक. 

हेरंब जोगळेकर, केदार टिकेकर, अथर्व आठल्ये, आनंद ओळकर, अमेय भडसावळे असे पाच तबलजी. 

या सर्वांची त्यांना अभूतपूर्व साथ लाभली. 

माझ्या माहितीप्रमाणे सहा ऑर्गनवादक, पाच तबलजी, आठ गायक-गायिका अशा सर्वांनी मिळून साकारलेला, रत्नागिरीतील पहिलाच प्रयोग असावा, जो अवर्णनीय झाला होता. ती नांदी मी नाट्यसंजीवनीच्या पहिल्या भागात आपल्यासाठी सादर करीत आहे. 

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी. 
संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZFFCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग दुसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दुसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language